कोल्हापूरच्या काळाइमाम तालमीच्या 'दुरूस्ती'ची कहाणी
करवीरनगरीची लाल माती ही महाराष्ट्राची अस्मिता! या मातीने राज्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंची फलटण दिली... कोल्हापूरचे कुस्तीचे आखाडे हे राज्याची शान होते. पण, आज घडीला फक्त सात आठ आखाडे शिल्लक उरलेत. शाहू महाराजांनी कुस्ती फुलवण्यासाठी तालमींना जमिनी दिल्या, आथिर्क सहाय्य पुरवले. मात्र संस्थांची 'कारणे' आणि सरकारच्या उदासीनतेमुळे आज उरल्यासुरल्या आखाड्यांना घरघर लागली आहे आणि त्याचे ताजे उदाहरण म्हणजे काळाइमाम तालिम! दुरूस्तीसाठी येथील ६०-७० मल्लांना दुसरीकडे सोय करण्यास सांगण्यात आले असून पुणे, सांगली, सातारा, नगर अशा जिल्ह्यातील मुलांसमोर आता जायचे कुठे? असा प्रश्ान् उभा राहिलाय.
आमदार मालोजीराजे हे कुस्तीप्रेमी असल्यामुळे त्यांनी आखाडे जगवण्यासाठी आपल्यापरिने प्रयत्न सुरू ठेवलेत. सुमारे अडीच कोटींचा निधी त्यांनी आखाड्याच्या दुरूस्तीसाठी दिला असून त्यापैकी दहा लाख रूपये काळाइमामला मिळालेत. सध्या तालमीची अवस्था अतिशय बिकट असून उपलब्ध परिस्थितीतही युवा कुस्तीगीर मेहनत घेत आहेत. मात्र त्यांची कुठलीही पर्यायी व्यवस्था न करता अचानक १ ऑगस्टपासून सोय करण्यास सांगण्यात आल्यामुळे त्यांना धक्का बसला आहे.
सर्वात हाल होणार आहेत ते शाळेत जाणाऱ्या मुलांचे. या शाळकरी मुलांचे छप्पर हरवले तर त्यांना सरावावर पाणी सोडावे लागेल, पण शालेय वर्ष तर फुकट जाण्याची भीती आहे. सध्या तीन चार महिने दुरूस्तीला लागतील, असे सांगण्यात येत असले तरी एकूण तालमीची स्थिती पाहता बरेच महिने काम चालणार आहे.
ऑलिंपिकपटू बंडा पाटील, हिंदकेसरी महमंद गौस, विष्णू माने, महाराष्ट्र केसरी लक्ष्मण वडार, उपमहाराष्ट्र केसरी रामा माने, संपत जाधव यांच्यासह श्ाीपती चव्हाण, बापू माने, रंगराव कळंत्रे असे सरस मल्ल या तालमीने दिले. मात्र गेली चार वषेर् तालमीत उस्तादच (प्रशिक्षक) नाही. मॅट नाही, जिमच्या साहित्याची वानवा, अपुरा पाणीपुरवठा अशा अनेक अडचणी असूनही केवळ जिद्द व चिकाटीच्या जोरावर ६०-७० मल्लांचा दम शिल्लक उरलाय...
काळाइमामचा मल्ल व कामगार केसरी समिंदर जाधव सांगतो, 'प्रशिक्षक नसतानाही एकमेकांना सूचना करत आम्ही सराव करतो. अडचणींचा डोंगर तर आहेच, पण त्याविषयी आमचं काहीच म्हणणं नाही. प्रश्ान् आहे तो वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील मुलांनी आता जायचं कुठे'.
याच तालमीच्या एका बाजूला पत्र्याचे शेड मारून १५-२० मुले राहत आहेत. याचपैकी एक इंदूर केसरी प्रशांत माने व्यथा मांडतो, 'कुस्तीगिरांना कोणी वाली नाही. राजकारणी आम्ही कुस्ती जिंकली की फक्त फोटो काढायला बाजूला येतात. राज्यातील कुस्ती संघटना तर नावापुरती उरलीय'.
याविषयी काळाइमाम तालमीचे प्रमुख वसंत सांगवडेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दुरूस्तीमुळे आम्ही मुलांना पर्यायी व्यवस्था करण्यास सांगण्यात आल्याचे मान्य केले. त्याचवेळी ते म्हणाले, 'आम्ही खेळाडूंना वाऱ्यावर सोडलेले नाही. पण दुरूस्ती ही कधीतरी करावी लागणारच होती. सध्या आम्ही दुसरीकडे कुठे मुलांची सोय होते का, याची चाचपणी करत आहोत'.