सांगलीत झालेल्या चुरशीच्या कुस्ती स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे सांगलीकर चंद्रहार पाटील यानेच ‘ महाराष्ट्र केसरी ’ चा मानाचा किताब पटकावला. अंतिम स्पर्धेत अहमदनगरच्या संदीप बारगुजेला धूळ चारत चंद्रहारने पुन्हा एकदा विजयश्री खेचून आणली.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम आज सांगलीच्या क्रांतीसिंह नाना पाटील मैदानात रंगला. घरच्या मैदानात होत असलेल्या स्पर्धेत चंद्रहार बाजी मारणार, अशीच अपेक्षा होती. आजचा अंतिम सामना मातीऐवजी मॅटवर खेळवला गेला. पहिली फेरी बरोबरीत सुटल्यानंतर दुस-या फेरीत दोन्ही कुस्तीगीरांनी आक्रमक पवित्रा घेतला. परंतु चंद्रहार संदिपवर भारी ठरला. ३ गुणांची कमाई करत त्याने पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकली.
चंद्रहारच्या विजयानंतर उपस्थित सांगलीकर कुस्ती शौकिनांनी एकच कल्लोळ केला. उत्साही कुस्तीशौकिनांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला.
No comments:
Post a Comment