Thursday, 19 May 2011

गोकुळ तालमीला हवाय आधार...

पुण्याच्या भवानी पेठेतील गोकुळ तालीम महाराष्ट्रालाच नव्हे तर साऱ्या देशाला अभिमान वाटावा अशी वास्तू आहे. काका पवारसारख्या अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूसह चार महाराष्ट्र केसरी, सात छत्रपती पुरस्कार विजेते मल्ल या तालमीने दिले... १०० वर्षांची मोठी परंपरा असणाऱ्या गोकुळची जबाबादारी गेल्या पंचवीस वर्षांपासून हरिश्चंद बिराजदार आपल्या भक्कम खांद्यावर वाहत आहेत, पण हा भार मामांना आता असह्य होत चाललाय... आपली गाऱ्हाणी लोकांसमोर मांडण्याची त्यांची सवय नाही. पण, एकेकाळी भारतातील नामवंत मल्लांना पाणी पाजणाऱ्या बिराजदारांच्या डोळ्यात मात्र गोकुळच्या भविष्याची चिंंता स्पष्टपणे दिसते.

राहुल काळभोर, दत्ता गायकवाड, गोविंद पवार, रवींद पाटील या साऱ्यांनी गोकुळचे नाव दुमदुमत ठेवले आणि आता या साऱ्यांची परंपरा चालवतोय तो राहुल आवारे! सध्या तालमीत दम घुमवणाऱ्या ६५-७० मल्लांपैकी एक असणाऱ्या राहुलने आपल्या जबरदस्त कामगिरीने तालमीचा डंका वाजवला असला तरी तोच डंका गोकुळचीही व्यथा सांगतोय... चार मजली इमारतीत पहिल्या माळ्यावर आखाडा, मॅट दुसऱ्या मजल्यावर, तिसऱ्या मजल्यावर व्यायामशाळा आणि चौथा मजला सराव व किचनचा. यात सत्तर एक मल्ल दाटीवाटीने राहतात. गावाकडून वर्षभर पुरेल इतके धान्य आणून मल्ल गुजराण करतात.

युवा राष्ट्रकुलच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियाचे काही खेळाडू ही तालिम बघायला गेले होते, तेव्हा तिची स्थिती पाहून हे परदेशी स्तब्ध झाले. बाहेरच्या माणसांचा दोन मिनिटे येथे श्वास कोंडत असताना ही मुले तासनतास कसा काय सराव करतात? असा प्रश्ान् उपस्थित झाला. त्यावेळी मामांचा हळवा सूर सांगत होता 'अतिशय प्रतिकुल परिस्थितीत आमचे खेळाडू तग धरू शकतात, याचे एकमेव कारण म्हणजे जन्मजात झगडण्याचे मिळालेले बाळकडू होय'. पण, ते साफ निराशही झालेले नाहीत. बालेवाडीत युवा राष्ट्रकुलच्या सांगता समारंभात ते भेटले तेव्हा हे दिवसही पालटतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी क्रीडा लेखक संजय दुधाणे यांच्या छोट्या मुलाच्या हाती शंभरची नोट ठेवली! 'मामा, पैसे कशाला. त्यापेक्षा तालमीला त्याचा उपयोग होईल', असे दुधाणे म्हणालेही. पण, मामांचे यावर उत्तर मामिर्क होते: महाराष्ट्राची ही परंपरा आहे. छोट्याला प्रथमच बाहेर काढलायस ना! त्याला रिकाम्या हाताने जाऊ द्यायचे नसते'.

कुस्तीची परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी मामा असाच जीवाचा आटापीटा करतायत, पण त्यांचे हात तोकडे आहेत. गोकुळ तालमीला हवाय भक्कम हातांचा आधार!

No comments:

Post a Comment