Monday, 16 May 2011

हिंदकेसरी मारुती माने












महाराष्ट्राच्या मातीतला कोहिनूर हिरा हरपला

हिंदकेसरी मारुती माने यांच्या निधनाचे वृत्त कळताच, कोल्हापुरातील ज्येष्ठ वस्तादांसह मल्ल शोकसागरात बुडाले होते. माने यांनी सादिक पंजाबीला चितपट केलेला क्षण, तब्बल अडीच तासांच्या लढतीत विष्णू सावर्डेकर यांच्यावर मिळविलेला विजयाचा क्षण अनेकांच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. महाराष्ट्राच्या मातीतला कोहिनूर हिरा, वस्तादांचा वस्ताद, जाणता कुस्तीगीर हरपला, या शब्दांत विविध वस्तादांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
हिंदकेसरी गणपतराव आंदळकर - लहानपणापासूनच आम्ही दोघे एकत्र असायचो. आम्हा दोघांत भावाभावाचे नाते होते. त्यांचे आकर्षक व्यक्तिमत्त्व सर्वांनाच भावणारे होते. त्यांच्या निधनाने माझा मोठा आधार तुटला आहे. एक जाणता कुस्तीगीर हरपल्याने कुस्ती क्षेत्राची हानी झाली आहे.
रुस्तुम ए हिंद हरिश्‍चंद्र बिराजदार - मारुती माने हे महाराष्ट्राच्या कुस्ती वैभवाचे शिलेदार होते. त्यांच्या निधनाने कुस्ती क्षेत्राची अपरिमित हानी झाली असून, त्यांच्यासारखा पैलवान आता होणे नाही.
महान भारतकेसरी दादू चौगुले - भारतातला एक चांगला मल्ल, अशी श्री. माने यांची ओळख होती. कठोर मेहनत घेतल्यानंतरच मल्ल मोठा होतो, हीच त्यांची धारणा होती. त्यामुळे ते जेव्हा कोल्हापुरात येत, तेव्हा मल्लांना सरावात सातत्य ठेवण्यास सांगत. त्यांचा तो सल्ला वस्ताद म्हणून नव्हे, तर कोल्हापूरचा पुत्र म्हणून असे. त्यांच्या निधनाने कुस्ती क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.
हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे - माने स्वच्छ मनाचे होते. त्यांचा कुस्ती लौकिक होता. पण शासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, हीच मोठी खंत आहे. एका चांगल्या मल्लाचे असे जाणे धक्कादायक आहे. एक मोठ्या मनाचा माणूस आणि कुस्तीचा जाणकार व महाराष्ट्रातला कोहिनूर हिरा काळाच्या पडद्याआड गेला.
माजी ऑलिंपियन मारुती आडकर - मारुती माने हे माझे आराध्य दैवत. त्यांच्यापासून मला खूप काही शिकायला मिळाले. 1965च्या सादिकविरुद्धच्या कुस्तीने मी प्रभावित होऊन त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी गेलो. त्याचा मला खूपच फायदा झाला. अनेकांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेतली. त्यांच्यासाठी कुस्ती हेच जीवन होते.
हिंदकेसरी दीनानाथसिंह - माने यांच्यासारखा दुसरा मल्ल होणे कठीण आहे. सादिक पंजाबीबरोबर त्यांनी दिलेली लढत आजही स्मरणात आहे. त्यांच्या कुस्तीतील डावपेचावर कुस्तीशौकीन फिदा असायचे. त्यांचे कोल्हापूरवर अतूट प्रेम होते. कोल्हापुरात आल्यानंतर मिसळ ते आवडीने खात; तर गंगावेशमधील दूध कट्ट्यावर एक लिटर दूध पीत. त्यांच्या निधनाने एक लढवय्या मल्ल व वस्तादांचा वस्ताद आपल्यातून निघून गेला आहे.
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील - कुस्तीतील डावपेचांचा त्यांचा मोठा अभ्यास होता. त्यामुळे त्यांचे सल्ले मला फारच उपयोगी पडले. आम्ही दोघेही एकाच जिल्ह्यातील असल्याने त्यांचा सहवास मला नेहमी लाभायचा. त्यांच्याशी गप्पा मारताना एक मोठा मल्ल किती संयमी आणि अभ्यासू असू शकतो, याची जाणीव होई. त्यांच्या जाण्याने नव्या पिढीला दिशा देणारा मार्गदर्शक हरवला आहे.
वस्ताद रसूल हनीफ - अत्यंत कष्टातून माने यांनी कुस्ती क्षेत्रात आपले नाव केले. त्यांनी महाराष्ट्राची शान वाढवली. त्यांच्या जाण्याने नव्या पिढीला आदर्श असणारा मल्ल हरपला आहे.
याला रशियाला पाठवा
1967 मध्ये मॅंचेस्टर येथे मारुती माने यांची रशियाच्या ऍलेक्‍झांडर मिद्विद या जग जिंकणाऱ्या मल्लाशी विजेतेपदाची लढत होती. त्या वेळी मिद्विद यांची आंतरराष्ट्रीय कुस्तीत मक्तेदारी होती, असे म्हटले तरी चालेल. त्यांच्याविरुद्ध कोणताही मल्ल दोन मिनिटांपेक्षा अधिक काळ टिकू शकत नव्हता. सलग चार ऑलिंपिक आणि चार जागतिक विजेतेपद मिळविणाऱ्या मिद्विद यांना महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने मात्र तब्बल 11 मिनिटे झुंजविले होते. माने ही लढत हरले. ""माने यांना रशियात पाठवा. हा आंतरराष्ट्रीय मैदान गाजविणारच'', अशा शब्दांत मिद्विद यांनी माने यांचा गौरव केला होता.

भाऊंची कारकीर्द

नाव - मारुती ज्ञानू माने (पाटील)
जन्म- 27 डिसेंबर 1938
मृत्यू - 27 जुलै 2010
व्यायामाची पद्धत - पहाटे 2 हजार 500 जोर व 3 हजार बैठका
हुकमी डाव - दुहेरी पट, हात काढून घिस्सा
खुराक - सकाळी एक लिटर व सायंकाळी एक लिटर दूध, दुपारी थंडाई एक लिटर, विविध प्रकारची फळे. एक किलो लोणी, अर्धा किलो तूप, अर्धा किलो मटण, एका वेळी 1 डझन केळी

कुस्ती क्षेत्रात मिळवलेले यश -

सुवर्णपदक- अखिल भारतीय स्पर्धा-(ओरिसा)- 1965
सुवर्णपदक- आशियाई क्रीडा स्पर्धा- जकार्ता- 1962
रौप्यपदक- आशियाई क्रीडा स्पर्धा- जकार्ता- 1962
रौप्यपदक- जागतिक स्तरावरील कुस्ती स्पर्धा- रशिया- 1963
हिंदकेसरी- अखिल भारतीय कुस्ती स्पर्धा- (पंजाब)- 1964
सुवर्णपदक- अखिल भारतीय कुस्ती स्पर्धा- दिल्ली- 1964
विजेतेपद- विरुद्ध पै. भीमसेन (सेनादल)- दिल्ली- 1964
विजेतेपद- विरुद्ध पै. महम्मद हनिफ- कोल्हापूर- 1964
विजेतेपद- विरुद्ध पै. विष्णू सावर्डेकर- कोल्हापूर- 1965
विजेतेपद- विरुद्ध पै. चंदगीराम (हरियाना) - बेळगाव - 1966
रौप्यपदक- विरुद्ध पै. अलेक्‍झांडर मिद्विद्‌ (रशिया)- 1967
रौप्यपदक- आशियाई क्रीडा स्पर्धा- (स्कॉटलॅंड)- 1969
विजेतेपद- विरुद्ध पै. सादिक (पंजाबी)- कोल्हापूर- 1970
विजेतेपद- विरुद्ध पै. दत्ता सिंग- कोल्हापूर- 1972

कुस्ती प्रचार आणि प्रसार -

कुस्ती संघटक - महाराष्ट्र शासनातर्फे सन 1981 मध्ये शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित.
अध्यक्ष - अखिल भारतीय कुस्ती निवड
समिती- 2 वर्षे
अध्यक्ष- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद
(सन 1981-1985 )
सदस्य - अखिल भारतीय कुस्तीगीर परिषद
(सन 1981 पासून, महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषद
(सन 1992-1995)
उपाध्यक्ष - अखिल भारतीय माजी मल्ल संघटना
( 92 पासून )
राजकीय कारकीर्द
कवठेपिरान ग्रामपंचायतीचे सरपंच - 25 वर्षे
सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य - 1960-72
वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे
संचालक व उपाध्यक्ष - 1970-80
राज्यसभा खासदार - 1985-1986
पारंपरिक कुस्तीचे प्रतीक


सांगलीजवळच्या कवठेपिरान (ता. मिरज) या छोट्याशा खेड्यात त्यांचा जन्म झाला. बालपण अत्यंत कष्टात गेले; पण वस्ताद मारेकरी यांनी हा मौल्यवान हिरा ओळखला. त्याला पैलू पाडण्याचे काम केले. प्रसिद्ध वस्ताद दुडाप्पाण्णा खोकले यांनी त्याला कुस्तीकलेचे धडे दिले. 24 जुलै 1958 रोजी आण्णा पाटोळे (करोली) या प्रबळ पैलवानावर विजय मिळवून हा कोहिनूर हिरा नावारूपाला आला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. जबरदस्त आत्मविश्‍वास व बलाढ्य ताकदीच्या जोरावर कुस्तीतील अनेक शिखरे त्यांनी पादाक्रांत केली. पहिले "महाराष्ट्र केसरी' पै. दिनकर दह्यारी यांच्याशी 18 एप्रिल 1959 रोजी त्यांची प्रेक्षणीय कुस्ती होऊन ती बरोबरीत सुटली.
त्यानंतर त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीस सुरवात झाली. सर्वप्रथम त्यांनी कटक येथे झालेल्या एशियन गेम चाचणी स्पर्धेत पै. भीम सीलाराम यांच्यावर मात केली आणि 1962 च्या जाकार्ता एशियन स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली. त्या स्पर्धेत त्यांनी फ्री-स्टाईल कुस्ती प्रकारामध्ये सुवर्णपदक व ग्रीकोरोमन कुस्ती प्रकारात रौप्यपदक अशी पदके मिळवली. या पराक्रमानंतर रशियातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली; पण त्या वेळी त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
1964 ला करनाल येथे झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत 6 फूट 5 इंच उंचीच्या मेहरदीन पैलवानावर मात करून त्यांनी "हिंदकेसरी'पद मिळवले. त्यानंतर शारीरिक दुखापतीमुळे टोकियो ऑलिंपिकमध्ये त्यांना भाग घेता आला नाही. 1970 मध्ये एडिंबरो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली. या दरम्यान आप्पा करजगी, भगवान मोरे, नाथा पारगावकर, महंमद हनिफ या त्या वेळच्या अव्वल पैलवानांबरोबर कुस्त्या करून कुस्ती क्षेत्रात त्यांनी दबदबा वाढवला.
कुस्ती इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेलेली कुस्ती म्हणजे 6 मार्च 1965 रोजी झालेली त्यांची व पै. विष्णूपंत सावर्डेकर यांची कुस्ती. कोल्हापूरच्या खासबाग मैदानातील ही कुस्ती तब्बल अडीच तास चालली. मैदानात लोकांना बसायला जागा नव्हती, एवढी गर्दी होती. त्यानंतर सांगलीमध्ये हिंदकेसरी हजरत पटेल, शाहूपुरी यांच्यावर 14 मिनिटांत त्यांनी मात केली. संपूर्ण महाराष्ट्रात ती कुस्ती गाजली.
महान मल्ल सादिक पंजाबीने महाराष्ट्राला आव्हान दिले होते. ते स्वीकारून कोल्हापूर येथे खासबाग मैदानात सादिकला चारीमुंड्या चीत करून त्यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. आक्रमकता आणि चपळता यात वाक्‌बगार असणारे मारुती माने यांना लाल मातीतल्या पारंपरिक कुस्तीचे प्रतीकच म्हणावे लागेल.

No comments:

Post a Comment